ड-जीवनसत्त्व

Jump to navigation Jump to search

ड-जीवनसत्त्व किंवा काॅलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी  शरीराला आवश्यक असणारा घटक आहे. जीवनसत्त्वांचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो.[१]

ह्या जीवनसत्त्वाची रोजची गरज बालकांसाठी ४०० IU ( International Unit ) तर प्रौढांसाठी ६०० IU इतकी असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती ८०० IU इतकी अधिक असते.

ड-जीवनसत्त्व
Drug class
Cholecalciferol-3d.png
Class identifiers
ATC संकेतांक A11CC
Biological target vitamin D receptor
Clinical data
Drugs.com MedFacts Natural Products
External links
वैद्यकीय विषय मथळा D014807
In Wikidata

महत्व

जीवनसत्त्व ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते  शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते. शरीराला ड  जीवनसत्त्वाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. काॅलिकॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्त्व ड चे आपल्या यकृतात २५ हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या घटकात रूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड त्याचे रूपांतर १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉलमध्ये करते. १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. असे रूपांतर करण्यात काही कारणाने अडथळा निर्माण झाल्यासही हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.[२]

स्रोत

ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते.

कमतरतेचे व अतिरेकाचे दुष्परिणाम

शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व नसल्यास हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे (osteomalacia ) तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) असे विकार होऊ शकतात.

याउलट त्याचे प्रमाण जास्त झाल्यास तेही शरीराला अपायकारक ठरू शकते. ड जीवनसत्व हे शरीरात साठवले जाते आणि  त्याचे उत्सर्जन होऊ शकत नाही. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मानसिक अस्वस्थता, चिडचिड, मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठ असे काही दुष्परिणाम होऊ शकतात.  

सूर्यप्रकाश आणि ड जीवनसत्त्व

आपल्या त्वचेमध्ये बीटा (β) डीहायड्रोकोलेस्टेरोल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर काॅलिकॅल्सिफेरॉल म्हणजेच ड जीवनसत्त्वामध्ये होते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळणे आवश्यक असते.

अतिनील किरणांचे (Ultra Violet) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते.[३] ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA )प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते.

अतिनील ब प्रकारचे किरण काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाहीत[४]. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले ऊन ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणे आवश्यक आहे.

हे ही पहा

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. क-जीवनसत्त्व
  4. ड-जीवनसत्त्व
  5. ई-जीवनसत्त्व
  6. के-जीवनसत्त्व


ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे हाडांतील बदल दर्शविणारे क्ष-किरण छायाचित्र

संदर्भ

  1. ^ Nutritive Value of Indian Foods- C Gopalan, B V Rama Sastri, S C balasubramanian. Hyderabad: National Institute of Nutrition. 2007. पान क्रमांक 11. 
  2. ^ Nutritive Value of Indian Foods- C Gopalan, B V Rama Sastri, S C Balasubramanian. Hyderabad: National Institute of Nutrition. 2007. पान क्रमांक 13. 
  3. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Low-on-vitamin-D-Just-soak-in-the-sun-between-11am-1pm/articleshow/50244279.cms.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  4. ^ https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19614895.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License. A link to the original article can be found here and attribution parties here. By using this site, you agree to the Terms of Use. Gpedia Ⓡ is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd.